तत्त्वज्ञानाची अलीकडची व्याख्या म्हणजे की तत्त्वज्ञान ही ज्ञानप्राप्तीची दुसरी पायरी आहे. या व्याख्येचे संक्षिप्त स्पष्टीकरण असे-

साधारणत: असे समजले जायाचे की तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वांचे, मूळ तत्त्वांचे ज्ञान, आता हे दिसून आले आहे की मूळ तत्त्वाचे ज्ञान, आता हे दिसून आले आहे की मूळ तत्त्वाचे ज्ञान तर आपल्याला उपलब्ध विविध विज्ञाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वगैरे देतात. ती विज्ञाने ज्या काही
साधनाच्या मदतीने आपल्याला ज्ञान देतात. त्या साधनांच्या उपकरणांच्या वा क्षमतांच्या अतिरिक्त मूलतत्त्वांचे ज्ञान प्राप्त करण्याची माणसांजवळ
कोणतीच विशेष क्षमता व साधन नाही. म्हणून मग आता तत्त्वज्ञानाजवळ एकच काम उरते व ते म्हणजे अशा मिळालेल्या ज्ञानाचे परीक्षण व मूल्यांकन करणे, विज्ञाने ही ज्ञानाची पहिली पायरी व त्या ज्ञानाचे मूल्यांकन करणे ही दुसरी पायरी. तत्त्वज्ञानाच्या अशा परिभाषेमुळे तत्त्वज्ञानांत कोणते विषय येतील हे सुद्धा मर्यादित होते. पारलौकिक व पराप्राकृतिक गोष्टी विज्ञानात नाहीत, त्या अप्रमाणित व असत्यापनीय आहेत म्हणून तत्त्वज्ञानांत सुद्धा येणार नाहीत. तत्त्वज्ञानांत येतील माणसांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी. परंपरागत तत्त्वज्ञानात येऊ शकणारे विषय साधारणत: असे - राजनैतिक तत्त्वज्ञान, अर्थदर्शन, समाजदर्शन, पर्यावरण दर्शन, इतिहासदर्शन, व्यावसायिक नीतिशास्त्र, सामान्यनीतिशास्त्र,
विज्ञान दर्शन वगैर. भाषेच्या चुकीच्या उपयोगामुळे सुद्धा समस्या निर्माण होतात. म्हणून भाषा दर्शनाची उत्क्रांती त्यात मानवाचे स्थान वगैरे गोष्टी जर अनिवार्य विषय म्हणून शिकविल्या जायला हव्या आदि.

समजायला सोपे विषय मला वाटते की सुरुवातीच्या वर्गांत असावे व कठीण आणि बुद्धीला ताण देणारे विषय वरच्या वर्गात असावे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टी तत्त्वज्ञानात असल्यामुळे तत्त्वज्ञानाच्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या सहजच वाढेल. पुढे जाण्याच्या आधी एक स्पष्टीकरण आवश्यक आहे.

विज्ञानाने दिलेल्या ज्ञानाचे परीक्षण व मूल्यांकन कोण व कोणत्या आधारावरच करेल ? उत्तर आहे - प्रत्येकजण करेल परंतु अज्ञानी व स्वार्थी व्यक्ती ते आत्मकेंद्रित आधारावर करेल तर प्रबुद्ध व सुज्ञ व्यक्ती हेच मूल्यांकन मानवनिष्ठच नाही तर निसर्गनिष्ठ सुद्धा आधारावर करेल, सगळ्यांसाठी अट ही आहे की तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी हटी असू नये. हे सगळे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तत्त्वज्ञानाची दृष्टी इतर विषयांच्या दृष्टीपेक्षा निराळी आहे. तत्त्वज्ञान शिकविताना ‘काय आहे’ हे तर शिकवायचेच आहे पण त्याच्याच बरोबर जे काही आहे ते तसे का आहे तसेच असावे का, मग ते कसे असावे इत्यादी गोष्टी तत्त्वज्ञानाने आपल्या व्यापक, दूरदृष्टी गहन ,आदर्शमूलक व परीक्षणात्मक दृष्टीकोणातून शिकविल्या पाहिजेत. इतिहासाचे तत्त्वज्ञान शिकविणे म्हणजे काही निव्वळ इतिहास किंवा रसायनशास्त्र किंवा समाजशास्त्र शिकविण्यासारख्याच कोणी शिकला तर तो विद्यार्थी तत्त्वज्ञानाचा खरा विद्यार्थीच नाही. मानवचेहित व प्रश्‍नार्थकता, ह्या गोष्टी असल्याशिवाय कोणी
तत्त्वज्ञानाचा खरा शिक्षकही असू शकत नाही. तत्त्वज्ञानाचे खरे शिक्षक मिळाल्यावर शिक्षणाचा स्तर आपोआप सुधारेल. मी तर म्हणेन की प्रश्‍न विचारत राहिल्यामुळे समाजाची सुद्धा गुणात्मक प्रगती होईल.

सॉक्रेटिसला विषाचा प्याला का प्यावा लागला त्याने राजाच्या विरुद्ध काही बंड केले नव्हते. तो ही देवीदेवतांना मानत होता. फक्त त्याने तरुणांमध्ये प्रश्‍न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण केली. कोणाही सत्तेला प्रश्‍न विचारणारे नागरिक नको असतात. त्यांना फक्त आज्ञाधारी दास हवे असतात. सॉक्रेटिसने हे होऊ दिले नाही. सॉक्रेटिसचा वारसा तत्त्वज्ञाने पुढे चालवायचा आहे. तत्त्वज्ञान ही व्यक्तींना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारी गतिविधी आहे. लक्षात हे ठेवले पाहिजे. की विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे तर दिलीच पाहिजेत. पण या ही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे; दिलेल्या उत्तरांवर प्रश्‍न करीत असणे. ज्ञानप्राप्तीची यात्रा अनंत आहे, पण ती अखंडपणे चालू ठेवली पाहिजे. व हे काम माझ्या मते फक्त तत्त्वज्ञान
हा विषयच करु शकतो.

प्रा. डॉ. शं. रा. तळघटटी
पुणे

१) विद्यापीठीय अभ्यासक्रमांमधील एक विषय म्हणून जरी आपण तत्त्वज्ञान विषयाचा विचार करीत असलो तरी ‘तत्त्वज्ञान’ हे ‘जीवनदृष्टी’ या स्वरुपात मानवाच्या सुखी जीवनाचा मूलाधार आहे ही गोष्ट निदान तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांनी तरी यथार्थपणे जाणून घेणे नितांत आवश्यक आहे.
अर्थात ही ‘जीवनदृष्टी’ प्रत्यक्ष जीवनात आचारांगाने प्रकट व्हावी अशी अपेक्षा आहे. थोडक्यात, व्यापक अर्थाने ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘जीवन दर्शन’ असे म्हटले तर ‘जीवनदृष्टी’ हे त्याचे विचारांग आणि ‘जीवनपद्धती’ हे त्याचे आचारांग म्हणता येईल. (इंग्रजीमध्ये त्यास अनुक्रमे Philosophy of
life, view of life d way of life म्हणता येईल) तत्त्वज्ञानाचा जीवनाशी असलेला हा जो मूलभूत आत्मीय संबंध आहे त्यावर भारतीय तत्त्वज्ञानात विशेषत: वेदान्त विचारात, विशेषत्वे भर दिला आहे. म्हणूनच त्यार ‘अधिकारी’ या संकल्पनेच्या रुपात तत्त्वज्ञानाच्या आदि, तर जीवनयुक्ताच्या व्यवहाराच्या रुपात तत्त्वज्ञानाच्या अंगी भारतीय तत्त्वचिंतकानी ‘ज्ञानांची’ ‘नीतीशी’ लग्नगाठ बांधली आहे. ‘सद्‍दर्शना’ ची परिणती ‘सद्‍आचारात होण्यातच तत्त्वज्ञानाची सार्थकता आहे. तत्त्वज्ञानाकडे पाहण्याचा हा भारतीय ‘पुरषार्थ प्रधान दृष्टीकोण अत्यंत व्यापक आणि मौलिक आहे असे मी मानतो. ज्ञानान्मोक्ष: ! किंवा ज्ञानदेव तू कैवल्यम्‌ ! या वाचनातून तो व्यक्त झाला आहे. याच औपनिषद दृष्टीकोणाचा स्वीकार करुन सर्व महाराष्ट्रीय संतांनी आपल्या भक्तीच्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन केले आहे. त्यातून विचाराचे सातत्य दिसून येते.

२) पाश्‍चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासावरुन ‘तत्त्वज्ञांना’ कडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होत गेल्याचे दिसून येते. ग्रीक, मध्युगीन अर्वाचीन आणि समकालीन या स्थूलरुपाच्या कज्ञालखंडांतून प्रवास करीत असता तत्त्वज्ञान ही अधिकाधिक आत्मकेंद्री बनत जाऊन त्याची जीवनाशी मूल्यांकित, जीवनाशी - काहीशी फारकत झाली आणि ते ‘व्यवसायीकरणा’ च्या मार्गाने (Professionalization) गेल्याचे दिसते. त्याची परिणती ‘तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वचिंतन’ (Philosophy is philosophising) या विचारात झाली. परंतु त्यालाही शेवटी भाषेचे बंधन पडून विषयमुक्‍त झालेले
तत्त्वचिंतन पुन: भाषा- बुद्ध झालेच ! भाषेचे, संकल्पनांचे विश्‍लेषण करण्यातच ते स्वत:ला धन्य मानू लागले. तत्त्वचिंतनची हत्यारे धारदार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला हे निर्विवाद सत्य. परंतु ही हत्यारे कोठे, कशाप्रकारे आणि कशी वापरायची या विषयी स्वत: ‘तत्त्वज्ञान’ काही सांगण्यास असमर्थ होऊन गेले. खर्‍या अर्थाने तात्त्विक प्रश्‍नांचे उगमस्थान जीवन आहे ही भूमिका सोडल्याने समकालीन तत्त्वज्ञान हे एकाकी पडल्यासारखे झाले. त्यास जीवनाभिमुक करुन बौद्धिक हत्यारांचा उपयोग जीवनातील जटिल प्रश्‍न सोडविण्यासाठी कसा करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.

३) तत्त्वज्ञान हा सर्व दृष्टींनी व सर्वार्थानेच महत्त्वाचा विषय आहे. त्यार अभ्यास विषयासंबंधीचे मूलभूत चिंतन, तत्त्वचिंतन केले जात असल्याने तो अन्य सर्व विषयांना पायाभूत आहे. ही गोष्ट त्या त्या विद्याशाखेतील त्या त्या विषयाच्या अभ्यासकांना (विद्यार्थी व शिक्षक) पटवून देण्याची गरज आहे. आपण ज्याला ‘........ चे तत्त्वज्ञान’ (philosophy of ....... ) वर्ग म्हणू. त्यात अभ्यासाचे यच्चयावत्‌ विषय समाविष्ट होऊ शकतात.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इत्यादी तत्त्वज्ञानांसह, विज्ञानाचे, कलेचे, धर्माचे तत्त्वज्ञांना ही आपले अभ्यास विषय आहेत. परंतु अशा प्रकारच्या उपयोजित तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा तत्त्वज्ञान - विभागापुरता न राहता तो त्या त्या विषयाच्या विभागातून केला जावा यासाठी आपण प्रयत्‍न केला पाहिजे. तत्त्वज्ञान विषयाचा तो स्वाभाविक विस्तार होईल. त्यासाठी आंतरविद्याशाखीय अभ्यासाला व विषयांना चालना देणे संपूर्ण शैक्षणिक विश्चाच्याच प्रगती साठी उपयुक्त ठरेल. पूर्वी असे काही प्रयत्‍न झाले होते परंतु त्यास फारसे यश मिळाले नाही. पुनर्‌प्रयत्‍नांची आवश्यकता आहे.

४) तत्त्वज्ञान विषयांच्या अभ्यासाला चालना मिळून महाराष्ट्राच्या सर्व थरांमधून विद्यार्थ्यांसह सर्वांचा अनुकूल प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने आपल्या तत्त्वज्ञान विषयांतर्गत विविध पातळ्यांवरील (B.A., M. A.) अभ्यासक्रमांची विचारपूर्वक रचना करणे हिताचे ठरले. हे करीत असता जागतिक तात्त्विक विचार प्रवाहांची दखल घेऊन त्यासं योग्य तो न्याय जसा द्यायला पाहिजे, तसाच महाराष्ट्रीय मराठी संस्कृतीमधील वैचारिक बलस्थानांचा उपयोग करुन तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांची कशी योजना करावी याचाही विचार केला जावा. माझ्या डोळ्यांपुढे
महाराष्ट्रीय संतांच्या व अन्य विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे. या संबंधात दोन तत्त्वे सुचवावीशी वाटतात. (एक) - विद्यार्थ्यांना व
सर्वसामान्य अभ्यासकास ‘तत्त्वज्ञान’ हा महत्त्वाचा तसाच जिव्हाळ्याचा विषय वाटला पाहिजे. (दोन) - तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा आपल्या आवाक्यात आहे तो ‘डोक्यावरुन’ जाणारा विषय नव्हे, असे सर्वांना वाटावे. तत्त्वज्ञान विषयाच्या प्रसाराच्या दृष्टीने या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विषयांच्या निवडीमध्ये ‘नोकरी’ सारख्या अर्थकारणाचा विचार बव्हंशी निर्णायक असतो हे खरे. परंतु मुख्य जरी नाही तरी,
पूरक विषय म्हणून सर्वजण तत्त्वज्ञानाचा विचार करु शकतील.

महाराष्ट्रात संतवाड्‌:मयाचा गीतेचा व अन्य तात्त्विक विषयाचा अभ्यास करणार्‍यांची व करु इच्छिणारांची संख्या फार मोठी आहे. येथे नोकरीचा
प्रश्‍न येत नाही. अशा अभ्यासकांची गरज भागविण्याच्या दृष्टीने उपयुक्त अभ्यासक्रम तयार करुन ते विविध प्रकारे राबविणे तत्त्वज्ञानाच्या विस्ताराचे एक महत्त्वाचे अंग होउ शकते. अशा उपक्रमांसाठी आपले महाविद्यालयीन व विद्यापीठीय तत्त्वज्ञान विभाग अधिक लोकाभिमुख होणे आवश्यक आहेत. तसेच अन्य विषयांचे विभाग व अशा प्रकारचे ज्ञानदान करणार्‍या अन्य संस्था यांच्याशी संपर्क साधून सहकार्याची देवाण - घेवाण करणे या दृष्टीने उपयुक्त ठरले. ( पुण्यात प्रत्यक्षात व्याख्यानमाला/ व्याख्याने, अभ्यासवर्ग, चर्चासत्र अशा प्रकारचे काही उपक्रम, गीताधर्ममंडळ, वै. मामा दांडेकर अध्यासन व श्रीपाद सेवा मंडळ यांच्या सहकार्याने झाले व होत आहेत. अन्य ठिकाणी पण अशाप्रकारचे उपक्रम
आयोजून तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे शक्य आहे.

५) अन्य विषयाच्या विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञानाचे दरवाजे आपण उघडले आहेतच, त्या जोडीला लहान लहान स्वरुपाचे अभ्यासक्रम तयार करुन जिज्ञासूंना त्यांच्या सोईने ते उपलब्ध करुनही तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे शक्य आहे. मात्र तत्त्वज्ञानाच्या महाराष्ट्रातील अभ्यासाच्या संबंधात एक
सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्‍न आहे तो मराठी पुस्तकांचा, पाठयपुस्तके व संदर्भग्रंथ पुरेशाच नव्हे तर मोठया प्रमाणात मराठीतून उपलब्ध असल्याशिवाय अभ्यासकांना तत्त्वज्ञान विषयाकडे आकृष्ट करणे कठीण होते. आज तत्त्वज्ञान विषयावर लिहिलेले जे वाड्‌:मय उपलब्ध आहे ते पुरेसे आहे असे म्हणणे धाडसा़चे होईल. जे आहे त्याच्या निर्मितीतही पूर्वीच्या पिढीतील प्रा. वाडेकर, डॉ. जी. एन. जोशी, प्रा. रेगे, प्रा. दीक्षित इत्यादींचा सिंहाचा वाटा आहे. त्यात काही प्रमाणात भर पडते ती ग्रंथ परामर्श मधील लेख व महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या अधिवेशनांतून वाचलेले व प्रसिद्ध झालेले लेख यांची प्रमाणभूत संदर्भग्रंथ, विविध तात्त्विक विषयांवरील अधिकृत पाठयपुस्तके आणि स्वतंत्र तत्त्वचिंतनात्मक ग्रंथ यांची निर्मिती मराठीतून होणे नितान्त आवश्यक आहे. तत्त्वज्ञान विषयाच्या मराठी भाषिक अभ्यासकांची ही गरज भागविणे ही आपली केवळ व्यावसायिक नव्हे, तर नैतिक जबाबदाररी आहे असे मानून तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी ग्रंथ लेखन, किंवा उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे भाषांतर, इत्यादी केल्यास हा मूलभूत प्रश्‍न सुटू शकेल. आशय, आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टींनी तत्त्वज्ञान विषयाचे ‘मराठीकरण’ झाल्यास तत्त्वज्ञानाच्या प्रसार- प्रचारास निश्चितच बळ लाभेल. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांस अधिक बौद्धिक परिश्रम घ्यावे लागतील हे निराळे सांगायला नको. तसेच परिभाषेतही सुसूत्रता, समानता असणे इष्ट आहे.

६) तत्त्वज्ञान हा जीवनस्पर्शी विषय असल्याने योग्य स्वरुपात तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे शक्यही आहे व इष्टही आहे. आजच्या अभ्यासक्रमात समाजिक अभ्यास व मूल्यशिक्षण या सारखे विषय शिकविले जात आहेतच. खरे हे विषय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, शिक्षक चांगल्या
तर्‍हेने शिकवू शकतील. त्याचप्रमाणे गणित आणि संगणक या विषयांशी संबंधित असलेल्या तर्कशास्त्र हा विषयही शालेय पातळीवर अध्यासनीय होऊ शकतो. त्या दृष्टीने विचार करुन काही ठोस योजना संबंधितांना सादर करता येईल.

७) तत्त्वज्ञान विषयाच्या प्रसारच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे या विषयासंबंधी समाजात प्रसृत असलेले गैर समज. हा विषय अत्यंत कठीण, सर्वसामान्य लोकांच्या, नागरिक, विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे हा एक गैरसमज. तसेच या विषयाच्या अभ्यासाचा व्यावाहारिक जीवनात काहीच उपयोग नाही अशी सर्वसामान्य लोकांचीच नव्हे तर सुशिक्षित वर्गाचीही धारणा असल्याचे दिसून येते. हे गैरसमज दूर होऊन तत्त्वज्ञान विषयाचे महत्त्व आणि सुगम्यता जसजशी लोकांना जाणवू लागेल तसतशी लोकमानसात त्याविषयी आस्था वाटू लागेल. त्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. शासनाच्या शिक्षण विभागालाही या विषयाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तरच तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापनासंबंधातील शासनाचे धोरण सर्व बाजूंनी अनुकूल होण्याची आशा बाळगता येईल. सुदैवाने महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने त्यांच्या शिकवणुकीच्या रुपात तत्त्वज्ञानाच्या परीसस्पर्श या भूमीला झालेला आहेच. तत्त्वज्ञानाच्या प्रसार - प्रचार कार्याला जर आपण त्यांचे आशीर्वाद घेतले तर ते कार्य निश्‍चितच सुकर होईल. मात्र, मुळात तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापकांच्या मनात आपल्या विषयाच्या महत्त्वासंबंधी कसलीही शंका असता कामा नये.

तत्त्वज्ञान विषयाचे हे प्रसार- कार्य करीत असता एक महत्त्वाचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची व तत्त्वचिंतनाची गुणवत्ता बाधित होता कामा नये. उलट ती कशी वाढेल व त्याद्वारा तत्त्वज्ञानाचे महत्त्व कसे वृद्धिंगत होईल याची काळजी घेतली पाहिजे.

तत्त्वज्ञान विषयाचे सार्वभौमत्व आणि मौलिक महत्त्व पाहता तो ‘सनातन’ व म्हणूनच ‘नित्यनूतन’ विषय असल्याची खात्री पटते. आणि म्हणूनच त्याच्या मराठी आविष्काराचे भविष्य निश्‍चितच उज्ज्वल आहे असे म्हणता येते.

डॉ. बी. आर. जोशी
१) महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संयोजकांनी उपरोक्त विषयावर जो परिसंवाद आयोजित केलेला आहे तो समयोचित आहे. परिसंवादाच्या प्रस्तुत विषयांवर चिंतन करुन काही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. या संदर्भात संयोजकांनी एक मार्गदशनपर टिपण तयार केलेले आहे. त्यावरुन असे स्पष्ट होते की या विषयाच्या संदर्भात पुढील तीन प्रमुख मुद्यांचा आणि त्यांच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.

अ) अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या तत्वज्ञान या विषयाला शिक्षण व्यवस्थेत नेमके स्थान कोणते आहे आणि ते स्थान त्याला कसे प्राप्त करुन देता येईल.
ब) तत्त्वज्ञान या विषयाच्या स्वरुपाबाबत जनमानसातील रुढ प्रतिमा व त्याचे परिणाम.
क) तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आंतविद्याशाखीय स्वरुपाचा जो विकास झालेला आहे आणि त्यातून ज्या अभ्यासशाखा निर्माण झालेल्या आहेत त्यांचा अन्य आंतरविद्याशाखांना उपयोग होण्याच्या दृष्टीने मांडणी कशी झाली पाहिजे.

वरील तीन समस्यांच्या अनुषंगाने जे मूलभूत प्रश्‍न टिपणामध्ये उपस्थित केलेले आहेत ते म्हणजे यापुढे तत्त्वज्ञान विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता असावा या विषयाचे भवितव्य काय आहे, हा विषय शालेय स्तरावर असावा असे वाटत असल्यास त्याचे नेमके स्वरुपकसे असावे, तत्त्वज्ञान या विषयाच्या विद्यार्थ्यांना भावी काळात रोजगाराची संधी कशी उपल्बध होणार, या विषयाच्या विकासासाठी सरकार, समाज व शिक्षणसंस्था यांची जबाबदारी कोणती असावी इत्यादी.

वरील मुद्दे व त्यातून निर्माण करण्यात आलेले प्रश्‍न यांच्यातील काहींबाबत काही विचार मांडण्याचा प्रयत्‍न या टिपणात केलेला आहे.

२) प्रारंभीच हे लक्षात घेतले पाहिजे की आज उच्च शिक्षणामध्ये कला व सामाजिक शास्त्रांतर्गत असे जे विषय आहेत त्यातील तत्त्वज्ञान विषयाखेरीज अन्य विषयांची भरभराट होत आहे, त्यांचे भवितव्य गुणवत्ता व रोजगार संधी या दृष्टीने उज्ज्वल आहे. अन्य विषयातील पदवीधरांना रोजगार तयार आहे. तत्त्वज्ञान विषयाची प्रकृती मात्र ढासळत चाललेली आहे, या विषयाच पदवीधर उपाशी राहत आहे. असे नाही. या सर्व विषयांची परिस्थिती सामान्यत: सारखीच आहे. याचे वास्तविक कारण म्हणजे हे सर्वच विषय छोटे बाबू, बडेबाबू, निर्माण करणार्‍या पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत व शिक्षण पद्धतीतच ठाण मांडून बसलेले आहेत. जोपर्यंत कालबाह्य अशा या पारंपरिक शिक्षण पद्धतीत डोळस परिवर्तन होत नाही तोपर्यंत यांच्या स्थितीतही सुधारणा होणार नाही. कालबाह्य अभ्यासक्रम शिकवत दरवर्षी पदवीधरांची एक नवी फौज निर्माण करीत राहिल्याने रोजगाराचा प्रश्‍न दिवसेंदिवस आणखी गंभीर होणार आहे. परिणामी विद्यार्थी संख्या रोडावत जाणार. आवश्यक तेवढी विद्यार्थी संख्या नाही (सर्व विषयांना समान लेखणारा सरकारी नियम) म्हणून ‘विषय संपला’ असे सरकार व शिक्षण संस्था जाहीर करणार असे होऊन नये. विषय जगावा, प्राध्यापक जगावेत म्हणून विद्यार्थ्यांची पळवापळवी होणार, काही वेळा सामंजस्याने विद्यार्थ्यांशी वाटाघाटी होणार, प्रसंगी मायाजालाने ‘किमान विद्यार्थी संख्या’ हजेरी पटावर पूर्ण करणार. विदारक परिस्थितीतून मार्ग कसा काढावयाचा याचा विचार पुढे करावयाचा आहे.

३) तत्त्वज्ञान या विषयच्या संदर्भात असे सांगता येईल की व्यक्तीजीवन आणि समाजजीवन प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्तात्त्विक चिंतन हे सर्वांनाच लाभदायक ठरणारे आहे. असे चिंतन हे मानवी जीवनाचे एक महत्त्वाचे अंग असून त्यामूळे एक नवी उच्च जीवनदृष्टी निर्माण होते. मूल्यव्यवस्था आणि मूल्य - कार्यान्वितता यातून व्यक्ती व समाजजीवनाला एक उन्नत आकार येतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता ही आधुनिक मूल्ये आणि प्राचीन भारतीय मूल्य व्यवस्थेत सांगितलेले साधारण धर्म म्हणजेच सत्य, अहिंसा, क्षमा, शील, करुणा, आत्मसंयम, दया, अनासक्ती, अनसूया (असूया नसणे) इत्यादी मूल्यांची चिकित्सा करुन त्यांना कृतिप्रवण करण्यात तत्त्वज्ञानाचा वाटा मोठा असतो. ‘मी’ आणि ‘आम्ही’ व्यक्ती व समाज यांच्यातील परस्परसंबंध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. आधुनिक जीवनातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समस्या, माणसाची विद्यमान परिस्थिती आणि त्याचे भवितव्य, विज्ञान, कला, साहित्य, धर्म, अध्यात्म, नीती, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील मूल्ये आणि त्यांचे परस्परसंबंध अशा अनेक विषयांचा तत्त्वचिंतनात समग्र, सकल आणि एकात्म दृष्टीने विचार करता येतो. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे षड्रिप नाहीसे करणे, किमान त्यांचा प्रभाव कमी करणे शक्य होते.

४) शिक्षण आणि तत्त्वज्ञान यांचे परस्परसंबंधही निकटचे आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमहत्त्वाचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असते, विद्यार्थ्याचे जीवन नीतिसंपन्न करणे. हे शिक्षणाद्वारे साधावयाचे असते. शिक्षणाच्या उद्दिष्टांची चतु:सुत्री पुढीलप्रमाणे सांगता येईल.
१) बालकांमधील सुप्त अगर अव्यक्त गुणांचा विकास साधणे २) त्यांना विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करुन देणे ३) जीवनात विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून विचारपूर्वक त्या दिशेने वाटचाल करणे ४) चांगले व कृतार्थ जीवन जगण्यास त्यांना समर्थ करणे. या उद्दिष्टांप्रत जाण्यासाठी शिक्षणाला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागते. अभ्यासक्रमाची रचना जीवनमूल्यांवर आधारित अशी करावी लागते. चांगली जीवनमूल्ये मानवी जीवनाला योग्य गती व दिशा देतात. जीवनमूल्यांचा विचार करताना वैयक्तिक मूल्यांबरोबरच सामाजिक मूल्यांचाही विचार झाला पाहिजे. ‘व्यक्तींच्या समाज व समाजांतर्गत व्यक्ती’ अशी वास्तवता असह्याने व्यक्ती व समाज, व्यष्टी व समष्टी या दोन्ही अंगांचा साकल्याने विचार करणे दोघांच्याही हिताचे असते. यासाठी अनेक प्रकारची मूल्ये लक्षात घ्यावी लागतात. त्यात आर्थिक मूल्याचाही विचार झाला पाहिजे व त्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक असते. याशिवाय साहचर्य मूल्ये आणि नैतिक मूल्ये यांचाही विचार अभ्यासक्रमाची रचना करताना केला पाहिजे. शिक्षणातील उद्दिष्टात शीलसंवर्धन हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्याचाही विचार करावा लागतो.

५) मूल्य शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊनच आज शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. मूल्यशिक्षणाद्वारे मूल्ये रुजविण्यासाठी अनेक मार्गही आहेत. उदा. अभ्यासक्रमात हा एक सक्तीचा विषय ठेवणे. पाठयपुस्तके तयार करणे, भक्तिपर गीते ऐकवणे, थोर विभूतींच्या उपदेशांचे सामुदायिक वाचन करणे, नैतिकता व मूल्यविचार यावर तज्‍ज्ञांची भाषणे आयोजित करणे. थोर विभूतींचे जन्मदिन साजरे करणे, नीतिमूल्ये व इतर मूल्यांवर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविणे, मूल्याभिमुख प्रकल्प शाळेत सरु करणे. उदा. सहकारी भांडार, सहकारी बॅंक इत्यादी. अशा उपक्रमांच्याद्वारे मूल्यशिक्षण देता येते. केवळ परीक्षेसाठी मूल्यशिक्षण अशी परिस्थिती असू नये. मूल्यशिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची जबाबदारी मोठी असते. शिक्षकांची दृष्टी मूल्याभिमुख असेल तर शिक्षक मूल्यशिक्षणासाठी परिणामकारक अध्यापन पद्धती वापरु शकतात. अभ्यासानुवर्ती उपक्रम सुरु करु शकतात. मूल्यशिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे हे खरे असले तरी केवळ शिक्षकांचीच ती जबाबदारी नाही. पालक, लोकनेते, स्वयंसेवी संघटना, वृत्तपत्रे, दूरदर्शन यासारखी प्रसार माध्यमे, सजग नागरिक इत्यादी सर्वांची ही संयुक्त जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक जागृत घटकाने आपण कोण आहोत. समाजव्यवस्थेत आपले स्थान काय आहे. व त्या स्थानानुसार आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. दुरितांविरुद्धचा लढा सर्व आघाडयांवर लढला गेला तरच दुरित नष्ट करणे शक्य होते.

६) आता पुन: आपण वरील परिच्छेद क्र. २ कडे वळणार आहोत. तत्त्वज्ञानासह सर्वच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास दर्जेदार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराची हमीही मिळावी यासाठी एका बाजूने प्राध्यापकांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने योजना आखल्या पाहिजेत तर दुसर्‍या बाजूने या विषयांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या विषयातील ज्ञान संपादन करुन घेत असतानाच, त्यासमवेत एखादे विशेष कौशल्य प्राप्त होईल अशाप्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेण्याची सक्ती केली पाहिजे. हे कौशल्यप्राप्तीचे शिक्षण प्रथम वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत सातत्याने राहिले पाहिजे. पारंपरिक अभ्यासक्रमात अशाप्रकारे बदल करणे आजच्या परिस्थितीत इष्ट ठरणार आहे. ही काळाची गरज आहे. केवळ पारंपरिक अभ्यासक्रमाच्या साहाय्याने सर्वांना रोजगार मिळणे अशक्य आहे, आणि रोजगार तर पाहिजेच. शिक्षण आणि नोकरी यांच्यात फारकत करावी. (Delinking of Education and Job) असे जरी कोठारी आयोगाने (१९६४) म्हटलेले असले तरी शिक्षणोत्तर काळात विद्यार्थ्यांना अर्थार्जन करावेच लागणार. माणूस खाण्यासाठी जगत नाही हे खरे असले तरी जगण्यासाठी खावे लागते हे विसरता येणार नाही. त्यासाठी अर्थार्जन ही आवश्यक अनिवार्य बाब समजून त्याची पूर्वतयारी शिक्षण व्यवस्थेतून झाली पाहिजे.

पदवी - पर्यंतचे शिक्षण सुरु असतानाच विद्यार्थ्यांनाच विशेष कौशल्यप्राप्ती झाली पाहिजे या हेतूने एक उपक्रम पुणे विद्यापीठात लवकरच सुरु होणार आहे. अशी घोषणा पुणे विद्यापीठार्फे अलीकडेच (२- १०- २००८) झालेली आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरी मिळावी म्हणून हा उपक्रम आहे असे सांगितले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम पायाभूत, माध्यमिक व प्रगत अशा तीन व्यवस्थापन टप्प्यात पूर्ण करता येतो आणि त्यात बॅकिंग, विमा, साखळी पुरवठा व्यवस्थापन, अरोग्य व्यवस्थापन अशा अनेक विषयांचा समावेश आहे. व्यवसाय शिक्षणामध्ये आपल्याला संगणक ज्ञान, टंकलेखन, पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट, छायाचित्रण इत्यादी प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश करता येतो. याशिवाय स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारीही करुन घेणे शक्य असते. एखाद्या परकीय भाषेचे ज्ञानही यादृष्टीने उपयुक्त ठरते.

 

७) तत्त्वज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमाबाबत विचार करता पुढील प्रकारचे काही बदल उपयुक्त ठरतात.

१) तत्त्वज्ञानाच्या केंद्रीभूत विषयांच्या सैद्धांतिक अभ्यासावर लक्ष देत असताना उपयोजित विषयांकडे दुर्लक्ष न करता अभ्यासक्रमात अशा विषयांनाही प्राधान्य द्यावे. यात उपयोजित नीतिशास्त्र, पर्यावरण व परिस्थितीकीय अभ्यास इत्यादींचा समावेश करता येतो.

२) सामाजिक तत्त्वज्ञान हे तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे अंग असल्याने अभ्यासक्रमाची रचना करताना या अंगाचा सुविचार करुन सामाजिक तत्त्वज्ञान काय आहे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना करुन दिले पाहिजे.

३) तत्त्वज्ञानाचे एक अंग म्हणून तर्कशास्त्र असावेच, पण त्याचबरोबर ‘तर्कशास्त्र’ एक स्वतंत्र विद्याविषय म्हणून विकसित केले पाहिजे. त्यात तर्कशास्त्राच्या विविध अंगांचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये उपयोजित तर्कशास्त्रही असावे. (उदा. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) , धूसर अगर संदिग्ध तर्कशास्त्र (Fuzzy Logic) इत्यादींचा समावेश करुन या तंत्रज्ञ शाखांमध्ये तर्कशास्त्राचा उपयोग कसा करण्यात आलेला आहे याचे ज्ञान, विद्यार्थ्यांना झाले पाहिजे. अशाप्रकारे केवळ ‘तर्कशास्त्र’ या विषयात विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करु शकेल अशी व्यवस्था केली पाहिजे.

४) तत्त्वज्ञान विषयाची व्याप्ती वाढावी या दृष्टीने ‘विज्ञानाचे पद्धतिशास्त्र ’, ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ या सारख्या विज्ञान शाखेला उपयुक्त अशा विषयांच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन असा प्रयत्‍न केला पाहिजे. तसेच तर्कशास्त्र या विषयाचा विधी विद्याशाखेत समावेश करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. काही विद्यापीठात विधी महाविद्यालयांमध्ये ही व्यवस्था झालेली आहे.

दोन व्यावारिक सूचना अशा -

१) आज ज्या महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञान तर्कशास्त्र या विषयांचे अध्ययन - अध्यापन होत आहे ते तसेच सुरु राहील असा प्रयत्‍न करणे. त्यादृष्टीने एखाद्या महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक निवृत्त झाले तर त्यांच्या जागी तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापकांची नेमणूक होईल अशी व्यवस्था करणे.

२) तत्त्वज्ञानासारखा तथाकथित गौण विषयांना किमान विद्यार्थी संख्येचे बंधन घालू नये. बंधन शिथिल होईल असा प्रयत्‍न करणे.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेने पुढाकार घेतल्यास परिषदेला आपल्या विभागीय शाखांच्या सहकार्याने वरीलपैकी काही सूचना कार्यवाहीत आणणे शक्य होणार आहे.