राजकीय लोकांना तत्त्वज्ञानाची विशेष गरज असते - शिवाजीराव भोसले
भिवंडी - दि.७ - माणसाने अनाग्रही व अभिनिवेशरहित असावे असे तत्त्वज्ञान लागते. पण लोकनेते मात्र वेगवेगळया प्रश्‍नांवरुन लोकांचा अभिनिवेश जागृत करतात. त्यामुळेच पंजाब, आसाम, बेळगावसारखे ज्वलंत प्रश्‍न निर्माण होतात. सध्या देशात तत्त्वज्ञानांच दुष्काळ पडला आहे.सत्तेजनिक असणार्‍या लोकांना तत्त्वज्ञानाची अधिक गरज आहे. असे उद्‍गार प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी येथे एका व्याख्यानमालेत बोलताना काढले.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेतर्फे आयोजित केलेल्या तिसर्‍या अधिवेशनातील ‘जीवन व तत्त्वज्ञान’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
काल या अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात दुपारी ‘धर्मनिरपेक्षता-भारतीय घटनेच्या संदर्भात’ या विषयी डॉ. सा. गे. निगुल, डॉ. ल. ग. चिंचोळकर, प्रा. ज. रा. दाभोळे, डॉ. श. रा. तळघटी यांनी निबंधवाचन केले.
तर आज या अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात श्री. गुरुदेवं रानडे या विषयावर डॉ. अ. ग. जावडेकर यांचे व्याख्यान झाले.
सदर परिषद यशस्वी होण्यासाठी परिषदेचे सचिव प्रा. अशोक कोर्डे, प्रा. डॉ. के. बी. सावंत, दासभाई पटेल आदींनी विशेष मेहनत घेतली.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद -३ रे अधिवेशन, भिवंडी
उद्‍घाटन कुलगुरु अभ्यंकर ग.ल.
मुंबई, सकाळ,रविवार, ता.९-११-१९८९
तात्त्विक अपेक्षा तत्त्वज्ञान अभ्यासानेच निर्माण होतात - वि.स.पागे यांचे प्रतिपादन
(आमच्या बातमीदाराकडून) भिवंडी, ता.८: तात्त्विक अपेक्षा या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने निर्माण होतात.त्यासाठी राष्ट्रपुरुषाचे तत्त्वज्ञानही महत्त्वाचे आहे. आजपर्यंत ८० ते ९० टक्के लोकांना जे तत्त्वज्ञान मिळाले आहे हे गीतेचे होय.गीतेचे तत्त्वज्ञान म्हणजे गीतेचे दर्शन होय. ते सर्वांना पाहावयास मिळते, असे उद्‍गार महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष वि. स. पागे यांनी काढले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे हे होते.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे तिसरे अधिवेशन भिवंडी महाविद्यालयाचा निरलॉन सभागृहात भरले होते. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पागे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जगात एकमेव धार्मिक ग्रंथ आहे तो म्हणजे "भगवद्‍गीता" तसेच त्याची ओवीबध्द टीका करणारी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ! "सर्व धर्मात परित्यज्य" या गीतेच्या श्‍लोकाचा अर्थ सर्व धर्म सोडा व मला शरणया म्हणजे बाकीचे धर्म सोडा या परता धर्म नाही. हीच निधार्मिकता होय. समग्राशी एकरुप होणे किंवा त्यास शरण जाणे हीच धर्मनिरपेक्षतेची संकल्पना होय.त्यासाठी तत्त्वज्ञानाची बैठक मूल्यांवर आधारित हवी व त्याचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्त्यांना मिळावे असेही ते शेवटी म्हणाले.
सकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य ग. ल. अभ्यंकर यांनी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‍घाटन दीप प्रज्वलित करुन केले. या
परिषदेसाठी महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून तर अहमदाबाद, मध्यप्रदेश वगैरे भागातून ३०० प्रतिनिधी आलेले आहेत. परिषदेच्या सुरुवातीलाच भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थापक पी., जी. जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाऊसाहेब धामणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. परिषदेचे सचिव प्रा. अशोक कोर्डे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.सौ.गो.निगल यांनी संदेश वाचन केले.
या प्रसंगी प्राचार्य ग.ल. अभ्यंकर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, भाऊसाहेब धामणकर वगैरेंची भाषणे झाली. सर्वश्री बाळासाहेब कर्वे, मे. पुं. रेगे, डॉ. अं. ग. जावडेकर, कार्याध्यक्ष ज. रा. दाभोळे वगैरे उपस्थित होते. शेवटी प्रा. वा. रा. कर्वे यांनी उपस्थितांचे परिषदेतर्फे आभार मानले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद -३ रे अधिवेशन, भिवंडी
परिषदेचा वृत्तांत ( लोकसत्ता १९/११/८६ )
विविध विचार - संघर्षांनी गाजलेले भिवंडी अधिवेशन
"आमच्या वेळी सर्व कार्यक्रमांना तत्त्वज्ञानाचा आधार होतो. ते तत्त्वज्ञान गीतेपासून जन्मलेले होते. पारतंत्र्य काळात आंधळ्यालासुध्दा कळेल असे स्वच्छ ध्येय होते. आता तसे नाही. माझ्या मताने खरा धर्मग्रंथ एकच आणि तो नाही. माझ्या मताने खरा धर्मग्रंथ एकच आणि तो म्हणजे भगवद्‍गीता. सर्व धर्म सोडून परमेश्वराला शरण जाणे म्हणजे धर्मनिरपेक्षता."
वरील आशयाचे विचार भिवंडी येथे दि. ६,७,८, नोव्हेंबर १९८६ रोजी भरलेल्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या तिस‌र्‍या अधिवेशनात मुख्य पाहुणे या नात्याने श्री. वि. स. पागे यांनी सांगितले. अध्यक्ष या नात्याने बोलताना डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी "तत्त्वज्ञ आणि धर्मज्ञ यातील फरक हा तत्त्वज्ञाचे कधीही समाधान होत नाही आणि धर्मज्ञ कोणत्या तरी श्रद्धेने स्वत:चे समाधान करुन घेतो. तत्त्वज्ञाची जिज्ञासा सखोल असते , तर सामन्य माणसाची जिज्ञासा उथळ असते. संस्कृतीची रुपे बदलली की तत्त्वज्ञानाची रुपेही बदलतात. ब्रिटिश भारतात आले नसते तर मुसलमान धर्म हा हिंदुधर्माचाच एक भाग झाला असता. इत्यादी विविध विचार मांडले, त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना उभे राहून बोलणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचे भाषण श्री. भेलके यांनी वाचून दाखविले. त्या लांबलचक भाषणाचे वाचन कंटाळवाणे होत आहे असे पहाताच स्वत: बारलिंगे यांनीच सूचना करुन त्या भाषणातील एकदम शेवटचा भाग वाचून दाखविण्यास सांगितले. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे. हे त्यांनी बसून छोटेसे भाषण करुन सांगितले असते तर ठीक बोलले नि चर्चा चांगली झाली असे म्हणता येईल. पहिल्या परिसंवादात विषयाला सोडून बोलले असे स्थूलमानाने म्हणता येईल. आयत्या वेळी श्री. प्र. नी. नवरे यांनी भाग घेतला. त्यांनी ‘धर्मनिरपेक्षता आणण्यासाठी घटनेत काय तरतूद केली आहे, त्या तरतूदीत काय उणिवा राहिल्या. त्या कशा नाहीशा करता येतील’ याचे विवेचन केले. ‘समान नागरी कायद्याचे विषय
धर्माशी निगडित नसल्यामुळे त्यांचा समावेश मूलभूत हक्कात करावा’ हा डॉ. आंबेडकरांचा विचार नेहरुंनी व घटना समितीने मान्य केला असता, तर या संबंधातील कितीतरी प्रश्‍न कायमचे सुटले असते असे श्री. नवरे यांनी सांगितले. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. अ. ग. जावडेकर यांनी ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोठमोठया राजकीय चुका केल्या गेल्या. पाकिस्तान मान्य करणे याचा अर्थ धर्मनिरपेक्षता अमान्य करणे होय, हिन्दूही सर्वधर्मसमभाव मानावयाचा याची फळे हिंदूंना भोगावी लागतील, इतके़च नव्हे तर मुसलमान - खिश्चन यांनाही भोगावी लागतील. इत्यादी चिंतनीय विचार मांडले. ‘ अर्थाची समस्या ’ या परिसंवादाच्या वेळी प्रभाकर नवरे यांनी पुष्कळदा आपल्या मनातील विचार लपविण्याकरिता आपण भाषा वापरतो यासंबंधीही विवेचन होणे आवश्यक आहे असा आगळा प्रश्‍न विचारुन गंभीर चर्चेत जरा खेळकरपणा निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला.

या संमेलनात एकूण चौदा व्यक्तिगत निबंध वाचले गेले, त्यांपैकी दोन-तीन निबंध वाचले गेले, त्यांपैकी दोन-तीन निबंध वादग्रस्त ठरले.
‘गुरुसंस्थेबाबत विचार- संघर्ष करणारे तत्त्वज्ञ - जे. कृष्णमूर्ती हा प्र. नी नवरे यांचा निबंध हा त्यांपैकी एक. ‘गुरुसंस्था झुगारुन दिल्याशिवाय सत्याचा शोध लागणारच नाही असा शोध कृष्णमूर्तींना लागला, गुरुचा नाद सोडल्याशिवाय साक्षात्कार नाही म्हणून मार्ग नसलेल्या मार्गाने ते सत्याकडे जाऊ लागले, गुरुजवळ काही मुक्तीचे गाठोडे नाही इत्यादी कृष्णमूर्तीच्या विचारांनी श्रोत्यांना अस्वस्थ केले नसते तर नवल. ‘देवीप्रसाद आणि भारतीय विचार- स्वातंत्र्य’ हा डॉ. बाळ गांगल यांचा निबंध चर्चिला गेला नसता तर आश्‍चर्य. ‘भारतीय तत्त्वज्ञानात जिवंत भाग किती’ आणि मृत किती या ग्रंथातील देवीप्रसाद चटोपाध्याय यांचा ‘भारतात विचार- स्वातंत्र्य नव्हते’ हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्‍न गांगल यांनी या निबंधात केला. निबंधवाचनापेक्षा निबंधलेखकाने त्यावर बोलणे जास्त चांगले असे वाटते. कारण निबंधवाचन चालू असताना वक्ते व श्रोते यांच्यात जे एकरुपतेचे वातावरण अपेक्षित असते ते निर्माण होत नाही. गुरुदेव रा. द. रानडे यांच्या शताब्दीनिमित्त डॉ. अ. ग. जावडेकर यांचे ‘गुरुदेव रानडे’ यावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. ‘गुरुसंस्था मी मानतो पण मी गुरुदेव रानडयांकडून वा अन्य कोणाकडून दीक्षा घेतली नाही या जावडेकरांच्या विसंगत वाटणार्‍या विचारावर प्रतिनिधी आपापसात चर्चा होणे स्वाभाविक होते.

प्राचार्य शिवाजीराव भोसले, स्वामीजी सच्चिदानंदजी महाराज व माधवराव गडकरी यांची जाहीर व्याख्याने हा अधिवेशनातील एक आकर्षक भाग. ‘जीवन आणि तत्त्वज्ञान’ यावर बोलताना शिवाजीराव यांनी सांगितले. ‘ज्यामुळे माणसाचे जीवन फुलते, ते त्या माणसाचे तत्त्वज्ञान, जे जीवनाची दिशा दाखविते ते जीवनाचे तत्त्वज्ञान, मुलांचा उत्साह आणि प्रौढांचा समज एकत्र आली की जीवनाचे कुरुक्षेत्र होते आणि आपली गीता आपल्याला सापडते. या त्यांच्या व्याख्यानावर प्रतिक्रिया काय असे मी विचारताचे एक पदवीधर तरुणी म्हणाली, "मला व्याख्यान आवडले पण त्यांनी नेमके काय सांगितले हे मला सांगता येत नाही." त्या तरुणीचे प्राध्यापक वडील म्हणाले, "मलासुद्धा सांगता येणार नाही" शब्दावर कोटया करण्याच्या शिवाजीरावांच्या हव्यासामुळे त्यांचे चांगले मुद्दे हरविले जातात असे वाटते.

स्वामीजी सच्चिदानंदजी महाराजांनी माझा चांगला अपेक्षाभंग केला. ते पारंपरिक असे काही बोलतील असे वाटले होते. पण महाराजांनी विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला. नवनवीन ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे असे सांगितले ही गोष्ट स्वागतार्ह वाटली.

अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माधवराव गडकरी यांनी ‘भारतातील राज्यकर्ते कधीच धर्मनिरपेक्षतेने वागत नाहीत. समान नागरी कायदा आणणे. हा धर्मनिरपेक्षता आणण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे’ असे आग्रहाने सांगितले. या अधिवेशनात औपचारिक कार्यक्रमाबरोबर एक स्वयंस्फूर्त कार्यक्रम झाला हे नमूद केलेच पाहिजे. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंर परगावचे प्रतिनिधी उकदत होते म्हणून म्हणा वा भिवंडीच्या डासांना भिऊन म्हणा पटांगणात वावरत होते. माझ्या मनात एक विचार येऊन गेला. माझ्या आसपास घुटमळणार्‍या नागपूरच्या सात-आठ तरुणींना मी बोलाविले नि म्हटले "तुम्ही तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थिनी आहात. तुम्ही तत्त्वज्ञान म्हणून विवाहसंस्थेविषयी काय विचार केला आहे ? तुम्ही तुमच्या लग्नाविषयी काय ठरविले आहे?" मुलींना असा काही तरी विषय हवाच होता. ‘हुंडा घेता कामा नये, मृतवत भांडल म्हणून दागिने करता कामा नयेत, रुसव्याफुग्याला वाव देणारा मानपान नको, कुंडल्यांना विज्ञानाचा एक टक्कासुद्धा आधार नाही, मुलींना पाहण्याच्या कार्यक्रमापेक्षा एकमेकांच्या परिचयाला कार्यक्रम हवा.’ इत्यादी निष्कर्ष चर्चेतून निघत होते. हे सर्व
निष्कर्ष अमलात आणावयाचे तर एखादे वेळी आमचे लग्नच होणार नाही अशीही शंका एकीने व्यक्त केली, ही चर्चा ऐकून आसपासचे तरुण प्रतिनिधी गोळा झाले व ते चर्चेत भाग घेऊ लागले. ‘स्त्री - पुरुष समानता’ चळवळीत काम करणार्‍या एका अविवाहित तरुणाने उत्साहाच्या भरात ‘अशी समान हक्काची मागणी करणारी तरुणी मिळाली नाही, तर मी लग्नच करणार नाही’ असे ठासून सांगितल्यामुळे चर्चेला चांगलाच रंग भरला. आसपासच्या प्रौढ प्रतिनिधींना आपणही भाग घ्यावा असे वाटले. प्रत्येक विवाहित माणसाने आपण आपल्या वैवाहिक जीवनात स्त्री- पुरुष
समानतेचे काय प्रयोग केले हे सांगावे असे मी सुचविताच प्रथम लोक थोडे बिचकले. पण मागाहून सर्व विवाहित स्त्री- पुरुषांनी आपापले अनुभव सांगितले. आता जवळ जवळ परगावाचे सर्वच प्रतिनिधी गोळा झाले होते. प्रत्येकजण आपापले मत सांगत होता. दुसर्‍याच्या मताचा प्रतिवाद करीत होता. हिंदू धर्मातील जन्मजात जाती व्यवस्थेचा विषय निघाला नि सरळ सरळ दोन तट पडले. हल्लीच्या जन्मजात जाती- व्यवस्थेचा बीमोड झाला पाहिजे यात सर्वांचे एकमत. पण कोणत्या कारणाने ही जन्मजात जातिव्यवस्था निर्माण झाली यात परस्परविरुद्ध मते. रात्रीचे अडीच- तीन वाजले. पाच-सहा तास चाललेला हा अनौपचारिक कार्यक्रम कोणालाच इच्छा नसताना संपवावा लागला. दुसर्‍या दिवशी या अनौपचारिक कार्यक्रमाचा इतका गवगवा झाला की, समारोपाच्या कार्यक्रमात कार्यवाह प्रा. अशोक कोर्डे यांनी या अनौपचारिक कार्यक्रमाचा आवार्जून उल्लेख केला.

स्वागताध्यक्ष भाऊसाहेब धामणकर यांचा उल्लेख करावाच लागेल. सामान्यपणे उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानंतर स्वागताध्यक्ष जे नाहीसे होतात ते समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळी दिसले तर दिसतात, असा सर्वसामान्य अनुभव. पण भाऊसाहेब रोज सकाळच्या पहिल्या चहापानापूर्वी सर्वांच्या आधी उपस्थित. ‘परगावाहून येणारे प्रतिनिधी हे आपले पाहुणे. तेव्हा त्यांच्याकडून निवास- भोजनाचे शुल्क घ्यावयचे नाही. हा भाऊसाहेबांचा आग्रह त्यांनी प्रत्यक्ष व्यवहारात आणला. ‘तत्त्व-दर्पण’ या ग्रंथाचे मूल्य काय म्हणाल तर ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेविषयी वाटणारी आस्था’ हे होय असे म्हटले आहे, हे वाचून सर्वांना धक्काच बसला.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे तिसरे अधिवेशन भिवंडी कॉलेजमध्ये ६ नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. त्या निमित्ताने तत्त्वज्ञानाची ओळख देण्याचा प्रयत्‍न या लेखात केलेला आहे.

तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, गुढवाद हे विषय आजही मानवी जीवनांत महत्त्वाचे म्हणून मानले जातात. आपल्या देशात तत्त्वज्ञान व धर्म यांचा अतूट
संबंध दिसून येतो. त्यामुळे धर्म ‘मोक्ष ’ हे भारतीय दर्शनकारांनी मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानलेले दिसून येते. तत्त्वज्ञान हे जीवनाचा व विश्चाचा साकल्याने मूलगामी विचार करणारे शास्त्र आहे. इथे शास्त्र म्हणजे सुव्यवस्थित व विमर्शक पद्धतीने विचार करणारी शाखा असा अर्थ अभिप्रेत आहे. तत्त्वज्ञानात श्रद्धेपेक्षा बुद्धीला अधिक महत्त्व दिले जाते एवढेच नव्हेतर श्रद्धा व बुद्धी यांचाही चिकित्सकपणे अभ्यास तत्त्वज्ञानात केला जातो. बुद्धीवाद, श्रद्धा, विवेक निष्ठा, अनुभव, तर्कशुद्ध, असे अनेक शब्द आपण व्यवहारात व संभाषणात वापरतो यांचा नेमका अर्थ काय? त्यांच्यातील संबंधाचे स्वरुप काय? अशा प्रश्‍नाची उत्तरे शोधण्याचे व विश्व, ईश्वर, आत्मा, जीव, मन, विचार इत्यादी संकल्पनांचे अर्थ स्पष्ट करण्याचे कामही तत्त्वज्ञानातील काही क्षेत्रांमध्ये केले जाते.

मूलत: तत्त्वज्ञानाची उत्पत्ती तरी कशी झाली ? विज्ञान व तत्त्वज्ञान यांच्या उगमाची बिजे मानवी प्रज्ञेतच आहेत. जिज्ञासा वा कुतूहल ही प्रेरणाच विज्ञान व तत्त्वज्ञानाची जननी आहे. माणसाला अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. त्यांना आपण इंद्रियजन्य अनुभव म्हणू. तसेच सुंदर सूर्योदय बघून किंवा सुंदर देखावा बघून येणारा सौंदर्यानुभव हाही एक अनुभव आहे. एखाद्या बालहत्येची बातमी ऐकूण येणारी चीड, हाही एक अनुभव आहे. त्याला आपण नैतिक अनुभव म्हणू. त्याचप्रमाणे साक्षात्कारी संतानाही विशिष्ट प्रकारे अनुभव येतात. त्यांना आपण धर्मानुभूती, आत्म-साक्षात्कार ईश्‍वर साक्षात्कार असे म्हणू. तसेच विविध प्रकारच्या क्षेत्रातील अनुभव येतात. या सर्व अनुभवाचे विश्‍लेषण, साकल्याने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्‍न तत्त्वज्ञ करीत असतात. म्हणूनच गुरुदेव रानडे म्हणत असत की तत्त्वज्ञान हे धर्मानुभूतीचे व्याकरण होय. खरे तर तत्त्वज्ञान हे सर्व प्रकारच्या अनुभवांचे व्याकरण आहे. व्याकरणात शब्दांची उत्पती शोधली जाते. वाक्यांचे पृथक्करण केले जाते. तद्वत तत्त्वज्ञानातही विविध अनुभवांचे उगम शोधले जातात. त्याचा साकल्याने विचार केला जातो. एवढेच नव्हेतर आपल्या अनुभवांच्या पृथक्करणातून सिद्ध होणार्‍या मूलतत्त्वांचा शोध व त्यांची चर्चा तत्त्वज्ञानात केली जाते. तसे करीत असताना चौफेर विहार करणारी चौकस बुद्धी हे
महत्त्वाचे साधन तत्त्वज्ञ वापरीत असतो. म्हणूनच तत्त्वज्ञान हे सत्य- असत्य चांगले वाईट, नित्य-अनित्य इत्यादींचे चिकित्सकपणे व साकल्याने
मूल्यमापन करणारे शास्त्र आहे असे म्हणता येईल.

इतर विज्ञाने वा शास्त्रे यांचे अभ्यासविषय निश्चित असतात. त्यांना मर्यादा असतात. तत्त्वज्ञानाची व्याप्ती व ‘कव’ मानवी अनुभवांच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करते. आपल्याकडे अगदी ऋग्वेद काळापासून अंतिम तत्त्वासंबंधीचे प्रश्‍न विचारलेले आढळून येतात. मी कोण? मी कशासाठी जन्माला आलो आहे ? जीवन व मृत्यू यांचा अर्थ काय? माझा व जगा़चा संबंध काय? जगाच्या मुळाशी ईश्‍वर आहे काय? असल्यास त्याचे स्वरुप काय? या सर्वांचे ज्ञान होते काय? मानवी जीवनाचे साफल्य कशात आहे? वगैरे प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा व उत्तरे अगोदरच पुस्तकांमध्ये वा पारंपरिक ज्ञानात असतील तर त्या उत्तरांचा चिकित्सकपणे अभ्यास करण्याचा प्रयत्‍न तत्त्वज्ञ करतात.

पाश्‍चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात धर्म व तत्त्वज्ञान, धर्म व विज्ञान असे तंटे आढळून येतात. ग्रीक तत्त्वज्ञानात मानवी बुद्धी स्वतंत्रपणे विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधीत होती असे दिसते. तत्त्वज्ञानात सर्वच ज्ञानशाखांचा समावेश होत असे. मध्य युगात मात्र स्वतंत्र बुद्धीवर बंधने आली. तत्त्वज्ञान हे धर्मशास्त्राची बटीक बनले. प्रबोधन काळात पुन्हा बुद्धीला प्रतिष्ठा प्राप्त झाली. नवे नवे तत्त्व- विचार तत्त्वज्ञांनी मांडले. बुद्धीला खूपच महत्त्व देण्यांत आले. एकीकडे विज्ञाने विकसित होत होती. परंतु तत्त्वज्ञांची बौद्धीक कसरत अनेकांना शुष्क चर्चा वाटू लागली.

तत्त्वज्ञ हे काल्पनिक जगात विहार करतात असा आरोप तत्त्वज्ञांवर होऊ लागला. विज्ञान हे व्यवहार- उपयोगी ज्ञान देते. ह्या विज्ञानाची पद्धती, वैज्ञानिक दृष्टिकोण, वैज्ञानिक ज्ञान ह्याच गोष्टी महत्त्वाच्या होत. काहींनी विज्ञानातील भाषेचे विश्‍लेषण करणे हेच तत्त्वज्ञानांचे काम होय असा सूर काढला त्यांनी तत्त्वज्ञानाला विज्ञानाची सेविका बनविण्याचा प्रयत्‍न केला. शेवटी वैज्ञानिकही माणूस असतो. अनेक वैज्ञानिकांनीच तत्त्वज्ञानातील प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. त्यांपैकी बहुसंख्य वैज्ञानिक हे ईश्‍वर मानणारे होते. काहींनी भाषेच्या विश्‍लेषणावर भर दिला त्यांतून ‘भाषिक तत्त्वज्ञान’ वा ‘भाषेचे तत्त्वज्ञान’ उदयास आले.

धर्म, विज्ञान, समाजशास्त्रे, आपापल्या परीने सत्य शोधन करीत असतात. त्यांच्या मूलभूत तत्त्वांचा व त्यांच्यातील मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास करणार्‍या तत्त्वज्ञांच्या अनेक उपशाखा आज निर्माण होते आहेत. उदाहरणार्थ धर्माचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, नैतिक तत्त्वज्ञान, सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञान, साहित्याचे वा कलेचे तत्त्वज्ञान इत्यादी. सत्य, शिवम्‌, सौंदर्य, दिक्काल, कार्यकारणभाव, मी ईश्‍वर, इत्यादी संकल्पनांचे विश्‍लेषण करणे अत्यावश्यक होय. तत्त्वज्ञ हेच काम करीत असतात. त्यांच्या संदर्भात व्यक्त केलेल्या विचारामधील विसंगती हुडकून काढून त्या दूर करुन त्यांच्या संबंधीचे सत्य शोधणे हेही तत्त्वज्ञानाचे काम होय. म्हणूनच अमेरिकेन मानस शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ ‘विल्यम जेम्स’ म्हणतो, "निश्चयपूर्वक सुसंगत विचार करण्याची पराकाष्ठा गाठणे तत्त्वज्ञान होय"

परंतू तत्त्वज्ञान ही केवळ बौद्धिक कसरत राहता कामा नये. ते जीवनापासून दुरावता कामा नये. तत्त्वज्ञान हे जीवनाभिमुखच राहिले पाहिजे. मानवी जीवनमूल्ये व कर्तव्ये यांच्यावर तत्त्वज्ञानाने प्रकाश टाकला पाहिजे. लोकांना तत्त्वज्ञानांकडून विशाल दृष्टी व विधायक दृष्टीकोण मिळाला पाहिजे.तसेच तत्त्वज्ञान हे केवळ शाब्दिक रुपात न राहता किंवा वादविवादांच्या आखाडयात न राहता ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. उदाहरणार्थ अद्वैताचा वेदान्ती सिद्धांत हा मठापुरता मर्यादित न राहता त्याचा सामाजिक आशयही सामाजिक अद्वैतांत परिणत्‌ झाला पाहिजे. त्यातून अनेक कृत्रिम भेदभावांचे विसर्जन होऊ शकते. तसेच अनेक अपसमज व अंधश्रद्धांचेही निराकरण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने सहज होऊ शकते. त्या दृष्टीने तत्त्वज्ञान हे लोकशिक्षणाचे मार्गदर्शकाचे कामही करु शकते.

श्रवण, मनन, निदिध्यान हे तीन टप्पे उपनिषद काळापासून आढळतात. श्रवण व वाचन यांच्यामुळे मिळालेल्या सत्यावर स्वत: विचार करणे व विवेकाने निश्चित केलेल्या सत्याचे चिंतन करणे वा ध्यान करणे असा सत्यशोधनाचा मार्ग उपनिषदात आहे. त्याचबरोबर नैतिक चारित्र विकसित करणे हे ही अत्यावश्यक आहे. म्हणूनच तत्त्वज्ञान हे केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता जीवनव्यापी बनले पाहिजे. त्यांच्या आधारे जीवन बदलले पाहिजे. तत्त्वज्ञ हे सत्यनिष्ठ व तत्त्वनिष्ठ असले पाहिजेत अशा तत्त्वचिंतकाचा परिणाम स्वत:वर व इतरांवर होऊन विचार गंगेचा प्रवाह शुद्ध व गतिमान राहतो, असेही म्हणता येईल.

त्या दृष्टीने मराठी भाषेतून अनेक प्रकारचे पाश्चात्य व पौर्वात्य विचार शिकवण्याची व शिकण्याची सोय तत्त्वज्ञानावरील मराठीतील पुस्तकाने होणार आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद ही संस्था त्याला पोषक आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या व्यासपीठावरुन विचारांची देवाणघेवाण होऊन ‘वादेवादे जायचे तत्त्वबोध:’ या न्यायाने लोकमानसातील शंकांचे निरसन करुन जीवनातील मूळ तत्त्वाचा बोध सर्वांना होऊन तो
बोध लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा तत्त्वज्ञान प्रेमींना मिळाली पाहिजे.

तत्त्वज्ञान हा दुर्बोध विषय न राहता तो सुबोध झाला पाहिजे. मातृभाषेत व साध्या शैलीत तत्त्वज्ञान लिहिले गेले पाहिजे. तत्त्वज्ञान हा विषय कठीण असला तरी तो सुंदर भाषेत लिहिला जाऊ शकतो. त्यामुळे हा विषय वाचनीय होऊ शकतो. प्रसिद्ध तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल, जे. पी. सार्त्र व बर्गसां हे तिघेही महान तत्त्वज्ञ होते. या तिघांनीही वाङ्‍मयीन नोबेल पारितोषिके मिळालेली होती. त्यांपैकी सार्त्राने विशिष्ट भूमिकेतून
नोबेल पारितोषिकाचा स्वीकार केला नाही. तसेच अनेक तत्त्वज्ञ हे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षित असूनही तत्त्वज्ञानाकडे वळलेले दिसून येतात.
स्थलाभावी त्या सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. अशा प्रकारे तत्त्वज्ञान हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्याचा प्रसार मातृभाषेतून लवकर होईल व तत्त्वज्ञान हा विषय लोकजीवनापासून दुरावणार नाही. ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या माध्यमातून तसे होवो.’

हिंदुस्थान विचारांपेक्षा आचारांना महत्त्व - कुलगुरु श्री. शिवाजीराव भोसले यांची खंत

लातूर, (प्रतिनिधी) : एखाद्या प्रश्‍नावर सखोल विचार करताना बुद्धीने दिलेल्या परस्पर विरोधी उत्तरांवर विचार करणारी बुद्धी म्हणजे तत्त्वज्ञानाचा उगम आहे. प्राण्यांना उपजत बुद्धीवर अवलंबून राहावे लागते, परंतु माणसांना मात्र विचारशक्ती लाभलेली आहे. असे मत मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य श्री. शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केले.

लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, तसेच देगलुरच्या व पूर्णा येथील महाविद्यालयांच्या तत्त्वज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे पाचवे अधिवेशन २१ ते २३ नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्‌घाटन सोमवारी कुलगुरु प्राचार्य श्री. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे होते.

या प्रसंगी तत्त्वज्ञान म्हणजे काय ? तत्त्वज्ञानी माणूस कोण ? या प्रश्‍नांवर उत्तरे देताना श्री. भोसले म्हणाले, "जीवनातील आचार, विचारांच्या कक्षेत तत्त्वज्ञानाची व्याख्या करता येते. एखाद्या गोष्टींचा शब्दबद्ध उगम कोठे होता. हे सांगता येत नाही. पण त्या प्रश्‍नावर विचार केला जातो, असे विचार करणे म्हणजे तत्त्वज्ञान होय."

विचाराशिवाय जगता येत असेल तर विचार करणे शुद्ध अविचार आहे असे मत व्यक्त करुन ते म्हणाले की, "आपल्या देशात स्वत:चे विचार दुसर्‍यापुढे मांडताना सामान्य माणसांना अनेक अडचणी येतात. विचार आचारांची युती आहे. आपल्या मुलांनी कसे वागावे असा उपदेश करणार्‍या वडीलधार्‍या मंडळींची शिकवण आणि त्यानुसार आज्ञापालन करण्याची संस्कृती म्हणजेच आचार होय. आपल्या देशात विचारांपेक्षा आचारांना अधिक महत्त्व दिले जाते अशी खंत व्यक्त करुन श्री. भोसले यांनी सांगितले की, "परराष्ट्रात आचरणास फारसे महत्त्व दिले जात नाही. विचार म्हणजे समाजाची एका अर्थाने मत्ता आहे. आणि विचार करणे म्हणजे प्रत्येक माणसांचा जन्मसिद्ध हक्क आहे."

तत्त्वज्ञानी माणसाचे लक्षण निदर्शनास आणून देताना श्री. भोसले यांनी सांगितले की, "विचारांविषयी पुनर्विचार करणे तसेच आपला विचार आपल्याकडून जोपासला जातो का व इतरांकडून तो तपासला जातो की नाही याचा विचार करणारे विचारवंत म्हणजे तत्त्वज्ञानी होय."

तत्त्वज्ञानाचे उदाहरण देताना त्यांनी एका डॉक्टराच्या विचारसरणीचा आधार घेतला. आई व मूल यांच्यावर शस्त्रक्रिया करीत असताना गंभीर परिस्थिती लक्षात घेताना दोघांपैकी कुणाला वाचवावे असा प्रश्‍न साहजिकच त्या डॉक्टरास पडतो. अशा परिस्थितीवर विचार करणे हा देखील तत्त्वज्ञानचा भाग आहे. काही गोष्टी कल्पनेने जाणायच्या असतात असेही ते म्हणाले, तत्त्वज्ञानाच्या माध्यमाद्वारे अर्थपूर्ण घटना, समाजाच्या समोर
आणण्यासाठी काही विचारवंत एकत्र येऊन अधिवेशन भरविण्यात येत आहे. हे अभिमानस्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी देगलूर महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या कलाकारांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य श्री. एम. एस. सिता नगरे होते, या प्रसंगी प्रा. श्री ज. रा. दाभोळे यांनी प्रास्ताविक भाषण केले प्रा. नागोराव कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रीमती माधवी कवि यांनी केले. याच वेळी बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुनप्पा बिडवे यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

या वेळी आमदार श्री. राजाभाऊ उदगीरकर, आमदार वसंतराव काळे, श्रीमती भोसले, नगराध्यक्ष श्री. मन्मथप्पा लोखंडे, श्री. शिवशरणप्पा चितकोटे, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद - ५ वे अधिवेशन, लातूर
( दैनिक ‘यशवंत’ लातूर, २२ नोव्हेंबर १९८८)

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे उद्‍घाटनपर भाषण - "मताला विचाराचा आधार नसेल तर लोकशाहीला अर्थच राहणार नाही"

लातूर - मनुष्य जीवनात ‘विचाराला’ फार महत्त्वाचे स्थान आहे. आज कधी नाही तेवढी जास्त विचाराची गरज भासत आहे. लोकशाही विचारावरच आधारित आहे. मताला विचाराचा आधार नसेल, तर लोकशाहीला अर्थ नाही, असे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद पाचवे अधिवेशन येथील गोदावरी लाहोटी कन्या प्रशालेत सुरु झाले, हे अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. कुलगुरुंच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन अधिवेशनास प्रारंभ झाला. उद्‍घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष श्री मन्मथप्पा लोखंडे हे होते.

आपल्या मिस्किलयुक्त भाषणात प्राचार्य भोसले म्हणाले, ‘आज चांगल्या विचाराची नितांत आवश्यकता आहे. सर्वच माणसे आपापल्या परीने विचार करीत असतात. परंतु विचार कसा करतात हेच त्यांना माहीत नसते. विचाराचा अभ्यास हाच तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यासविषय आहे.

आचार, विचार, उच्चार याविषयी केलेले चिंतन हे तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकक्षेत येते.

विद्यार्थ्यांविषयी बोलताना प्राचार्य भोसले म्हणाले, सध्याचा विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाताना दिसत आहे. विद्यार्थ्याचे लक्ष विद्याजर्नामध्ये नाही, त्याचे लक्ष वर्गात नसते व बाहेरही नसते, कोठे असते हे कोणालाही माहीत नसते (हशा).

प्रारंभी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य भोसले यांना मराठवाडा विद्यापीठांचे कुलगुरुपद मिळाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेतर्फे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. ज. रा. दाभोळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुलगुरु भोसले यांच्या सौभाग्यवती यांचाही साडी व खण देऊन सत्कार करण्यात आला.

देगलूर महाविद्यालयातील संगीत विभागातर्फे प्रा. बाबूराव उत्पलवार व त्यांच्या सहकार्‍यांनी स्वागत गीत सादर केले.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य सीतानगरे यांनी अधिवेशनामागची भूमिका विषद केली. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. ज. रा. दाभोळे यांनी परिषद स्थापनेमागील हेतू व परिषदेचे उद्दिष्ट विषद केले. भिवंडीस येथील प्रा. अशोक कोरडे यांनी आपल्या भाषणात परिषदेच्या
कार्यकारी मंडळातील सदस्यांची कार्यकारी मंडळातील सदस्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष श्री मन्मथप्पा लोखंडे यांनी आपल्या भाषणात, तरुण पिढी ज्ञानापासून दूर जात आहे. असे होऊ नये म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. समाजाची, देशाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्याची ताकद अंगी असलेली व्यसनमुक्त भावी पिढी निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार तत्त्वज्ञान या विषयाने करावा असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे यांनी तत्त्वज्ञानाच्या अमर्याद अभ्यास विषयाची माहिती दिली. मी कोण आहे ? मी ज्या जगात राहतो त्याचा अर्थ काय ? मी व विश्व यांच्यातील संबंध काय ? या तीन प्रश्‍नांच्या उत्तराच्या शोधातून तत्त्वज्ञानाची निर्मिती झाली आहे. या तीनही प्रश्‍नांची अनेक उत्तरे आत्तापर्यंत देण्यात आली आहेत. परंतु खरे व पूर्ण उत्तर अद्यापही मिळाले नाही. या प्रश्‍नाच्या उत्तराच्या शोधाचे कार्य तत्त्वज्ञानाच्या मार्फत अद्यापही चालू आहे. विज्ञानाचा अभ्यास ‘काय’ (What ) चे उत्तर देतो. ‘का’ ( Why ) चे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही.
या ‘का’ चे उत्तर देण्याचे कार्य तत्त्वज्ञान करीत असते असे प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचलन प्रा. माधवी कवि यांनी केले तर प्रा. नागोराव कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमास आ. राजाभाऊ उदगीरकर, आ. वसंत काळे, महात्मा बसवेश्वर शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जूनच्या माणसांनी जगावे कसे या प्रश्‍नांच्या उत्तरादाखल प्रयत्‍न करुन शोधलेले विचार म्हणजे धर्म होय. म्हणूनच धर्माशिवाय तत्त्वज्ञान अशक्य आहे. असे प्रतिपादन भोसले यांनी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या पाचव्या अधिवेशनाचे उद्‍घाटन करताना केले.

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील गोदावरी लाहोटी कन्याशाळेत या अधिवेशनाचा उद्‍घाटन सोहळा संपन्न झाला. हे अधिवेशन दि. २३ पर्यंत चालणार आहे.

माणूस जन्माला येतो तो विचारशक्तीसह. या विचाराला अधिक स्वातंत्र्याची गरज आहे असे सांगून प्राचार्य भोसले यांनी पोथीबंद धर्मपद्धतीवर टीका केली.

धर्माला मानणार्‍यांपैकी आपण एक आहोत त्यामुळेच विचांराची महत्तता समजून सांगण्याचे काम आजवर आपण प्रामाणिकपणे केल्याचे भोसले यांनी सांगितले, तर लोकशाहीला धोका !

विचाराचे व्याकरण सांगणार्‍या भाष्यकारांना सुद्धा लोकशाहीच्या या कालखंडात विचारांची गरज आहे. मताला विचारांचा आधार असेल तर सामाजिक प्रश्‍न सुटतील अन्यथा लोकशाहीलाही धोका पोहोचेल असा इशारा देऊन कुलगुरुंनी प्राध्यापकांना तत्त्वज्ञान जाणून घेण्याचे आवाहन केले.

विज्ञान युगात तत्त्वज्ञानाचे कामच शिल्लक नाही असा अनेकांचा समज आहे परंतु विज्ञानाच्या परिभाषेच मूळ विचार तत्त्ववेत्त्यांनीच तयार केले आहेत हे विसरुन चालणार नाही याची आठवण कुलगुरुंनी करुन देऊन आचार, विचार आणि उच्चार याविषयी माणसाने केलेले विवेचन तत्त्वज्ञानाच्या आधारावरच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मठपणामुळे धर्माला पडता काळ आला होता; परंतु कर्मठपणा धर्मातून घालविल्यास अनेक समस्येची सोडवणूक होईल, असा विश्‍वासही श्री भोसले यांनी भाषणात व्यक्त केला.

प्रारंभी स्वागाताध्यक्ष प्राचार्य श्री. एम. एस. सातानगरे यांचे स्वागतपर भाषण झाले. कार्याध्यक्ष श्री. ज. रा. दाभोळे यांनी महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची उद्दिष्टे सांगितली. तर म.ब. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जूनप्पा बिडवे यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. नगराध्यक्ष श्री मन्यथप्पा लोखंडे यांचेही यावेळी भाषण झाले.

लातूर, पूर्णा व देगलूर महाविद्यालय विभागाच्या वतीने हे राज्यस्तरीय अधिवेशन येथे होत आहे. उद्‌घाटन सोहळ्याचे संचलन प्रा. सौ. माधवी कवि यांनी केले, तर आभार प्रा. नागोराव कुंभार यांनी मांडले.

कार्यक्रमास आ. राजाभाऊ उदगीरकर, आ. वसंतराव काळे, म. ब. शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवशरणप्पा चितकोटे यांच्यासह प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

पुणे दि. २४- सर्व विश्वासाठी एकच धर्म, एकाच सत्याचा आग्रह धरणे संकुचितपणाचे लक्षण आहे. त्याऐवजी विविध धर्म, विचारधारांबद्दल आदर बाळगणार्‍या सम्यक्‌ दृष्टिकोणानेच मानवी कल्याण साधले जाऊ शकते, असे प्रतिपादन शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी आज येथे जागतिक तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‍घाटन करताना केले.

संत ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दी वर्षाच्या निमित्ताने येथील ‘महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

विज्ञान, धर्म व तत्त्वज्ञानाचे संमेलन असलेल्या या परिषदेचे उद्‍घाटन करताना श्री. दलाई लामा म्हणाले, "विश्वातील तत्त्वे भिन्न- भिन्न स्वरुपाची आहेत. त्यामुळे त्यावर आधारित धर्माचे स्वरुपही भिन्न आहे. अशा स्थितीत एकाच वैश्विक धर्माचा वा विचारधारेचा आग्रह धरणॆ काहीसे संकुचितपणाचे होईल. त्यामुळे धर्माच्या बाबतीतही वैविध्य असायला हवे."

धार्मिक विविधतेचा ‘धर्मांचे सुपरमार्केट’ असा उल्लेख करुन श्री. लामा म्हणाले, "या सुपरमार्केटमधून ज्याला धर्म भावेल तो त्याचा स्वीकार करेल. या भिन्न विचारधारांनी, धर्मांनी परस्परांविषयी आदर बाळगून निकटचा संबंध ठेवला, तर त्यातून निर्माण होणार्‍या सम्यक दृष्टिकोणातून विश्वाचे कल्याण साधले जाऊ शकते.

बुद्धधर्माचा अनुयायी म्हणून मी पुनर्जन्म मानतो. त्यानुसार आपण सारे या पृथ्वीवरील प्रवासी आहोत, असे सांगून दलाई लामा म्हणाले, "प्रवाशाने नव्या जागी जाऊन समस्या निर्माण करणे मूर्खपणाचेच आहे."

मानवी बुद्धिमत्ता व सामर्थ्याचा विधायक उपयोग करण्यासाठी सहृदयता प्रेम व करुणा या मूल्यांची नितांत गरज आहे. असेही प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रीय विज्ञान व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, "गुणात्मक विकासाऐवजी संस्थात्मक विकासावर भर दिल्याने आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

जागतिक तत्त्वज्ञान परिषद आणि मराठी तत्त्वज्ञान परिषद - १३ वे अधिवेशन, पुणे
मानवजातीच्या विकासासाठी अनेक धर्मांचे अस्तित्व आवश्यक दलाई लामा यांचे प्रतिपादन

पुणे ता. २४ : ‘एक जग - एक धर्म’ ही संकल्पना संकुचित मनोवृत्तीचे द्योतक असून जगात अनेक धर्माचे अस्तित्व असणे मानवजातीच्या विकासासाठी आवश्यक आहे, असे विचार बौद्ध धर्मगुरु आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. दलाई लामा यांनी आज येथे व्यक्त केले.
श्री संत ज्ञानेश्वर महारांजाच्या संजीवन समाधी सप्तशताब्दीनिमित्त ‘महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) ने आयोजित केलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. आपल्या बुद्धिसामर्थ्याचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी करुन पृथ्वीतलावर शांतता आणि सौख्य आणण्यासाठी मानवाने प्रयत्‍न करावेत, असे आवाहनही डॉ. लामा यांनी यावेळी केले.

पेजांवर मठाचे (उडपी) स्वामी विश्वेश तीर्थ, परिषदेचे आणि ‘युनायटेड अर्थ’ चे अध्यक्ष डॉ. क्लाएस नोबेल हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. यशपाल, दिल्लीच्या ‘इस्लामिक सेंटर’ चे संस्थापक मौलाना बहिदूद्दीन खान, महापौर कमल व्यवहारे, कृषिमंत्री शशिकांत सुतार आदी
व्यासपीठावर उपस्थित होते. आठवडाभर चालणार्‍या या परिषदेसाठी जगभरातून विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, आंणि धर्म या क्षेत्रातील तज्ज्ञ आले
आहेत.

अनेक धर्माचे अस्तित्व असणे हितकारक आहे, असे नमूद करताना डॉ. लामा म्हणाले, "अनेक धर्म असले, की कोणत्या धर्माचे आचरण करावे याबाबत प्रत्येकाला निवड करता येऊ शकते. एकाच धर्मामुळे येणारा एकसुरीपणा नाहीसा होतो. विविध धर्मामध्ये आदान - प्रदान होऊ शकते. त्यामुळे समाजाचा विकासच होतो. म्हणूनच एक जग एक धर्म ही संकल्पना मला मान्य नाही. दुसर्‍यांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांचे कौतुक करणे, आदी बाबी बहुधर्मीय पद्धतीमुळे होऊ शकतात."

पृथ्वीवरील मानवजात संपुष्टात आल्यास पृथ्वी अधिक सुरक्षित राहील, असे गमतीने नमूद करुन ते म्हणाले, "मानव विनाशाच्या उंबरठयावर उभा आहे. खरे तर मानवाला विचार करण्याची दैवी देणगी आहे. तसेच बुद्धिसामर्थ्यची आहे. मात्र या सामर्थ्याचा उपयोग नकारात्मक कामांसाठी केला जात आहे. मानवाने विनाशकारी दृष्टिकोण सोडून द्यावा. आपण या पृथ्वीतलावर एक पर्यटक म्हणून आलो आहोत. तेही फार कमी कालावधीसाठी तेव्हा या वसुंधरेचा र्‍हास करणे मानवाने सोडून द्यावे. आपल्या बुद्धिसामर्थ्याचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी करावा. पृथ्वीवर शांतता आणि सौख्य प्रस्थापित होणे गरजेचे आहे त्यासाठी बुद्ध धर्माचा अनुयायी म्हणून मी पुनर्जन्म मानतो. त्यानुसार आपण सारे या पृथ्वीवरील प्रवासी आहोत, असे सांगून दलाई लामा म्हणाले, "प्रवाशाने नव्या जागी जाऊन समस्या निर्माण करणे मूर्खपणाचेच आहे."

मानवी बुद्धिमत्ता व सामर्थ्याचा विधायक उपयोग करण्यासाठी सहृदयता प्रेम आणि करुणा या मूल्यांची नितांत गरज आहे. असेही प्रतिपादन त्यांनी केले.
या वेळी बोलताना उडपी येथील पैजांवर पीठाचे स्वामी विश्वेशतीर्थ म्हणाले की, "पृथ्वीसाठी सूर्य व चंद्राला जे महत्त्व आहे, ते महत्त्व मानवी जीवनासाठी तत्त्वज्ञान व विज्ञानाला आहे. मानवी कल्याणासाठी तत्त्वज्ञान सूर्यासारखे, तर विज्ञान चंद्रासारखे आहे. प्रपंचगतीचे अक्सिलेटर विज्ञान तर स्टिअरिंग व्हिल तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे दोन्हीचा मेळ साधला नाही तर गती क्लेशकारक ठरेल."

कुत्रा आपला मालक कोत्याही वेशात आला तरी त्याला ओळखतो, असा दाखल देऊन स्वामी विश्वेशतीर्थ म्हणाले, "आज मानवाची समज कुत्र्यापेक्षाही कमी झाली आहे. कारण परमेश्वररुपी अंतिम तत्त्व वेगळ्या धर्माच्या रुपाने समोर आले की, ते ओळखायचे सोडून आपण संघर्ष सुरु करतो."

ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेडयामुखी वेद वदविले याचा उल्लेख करुन स्वामी म्हणाले "आजच्या समाजातली जडत्व व पशुत्व नष्ट करुन चैतन्य आणण्याची गरज आहे."

"शांतता म्हणजे केवळ युद्धाचा अभाव नव्हे", असे प्रतिपादन करुन न्यूयॉर्कस्थित युनायटेड अर्थ संस्थेचे अध्यक्ष क्लाईस नोबेल म्हणाले की, शांतता आपल्या स्वत:च्या अंतरातही शोधण्याची खरी गरज आहे. ही शांतता निसर्गाशी वैश्विक शक्तीशी जवळीक साधूनच प्राप्त करता येईल.

यावेळी बोलताना राष्ट्रीय विज्ञान व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, "गुणात्मक विकासाऐवजी संस्थात्मक विकासावर भर दिल्याने आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. इंटरनेट सारख्या विज्ञानप्रणीत माध्यमांनी मानवी मेंदू जोडले गेले. परंतु , आता त्याही पलीकडे जाऊन मानवी हृदय जोडण्याची गरज आहे." यावेळी तत्त्वज्ञान परिषदेच्या निमित्ताने जगभरातील विविध शास्त्रज्ञ व तत्त्वचिंतकाच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘इन दी क्केस्ट ऑफ युनिव्हर्सल पीस’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशनही डॉ. माशलेकर यांच्या हस्ते झाले. स्वामी विश्वेशतीर्थ यांच्या हस्ते ‘संत ज्ञानेश्‍वर विश्वशांती ग्रंथालय’ वास्तू चे उद्‍घाटनही या वेळी झाले.

परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी स्वागत केले. मानव कल्याणचे उद्दिष्टे ठेवणार्‍या वैश्विक शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज असून त्या संदर्भात परिषदेत विचार होईल असे त्यांनी सांगितले. मुस्लीम तत्त्वज्ञ मौलान वहिदुद्दिन खान, कोलंबिया विद्यापीठाचे प्रो. एरिक मोर्टसन परिषदेचे सहअध्यक्ष एम. ए. पार्थसारथी यांचीही या वेळी भाषणे झाली. महापौर कमल व्यवहारे, पालक मंत्री शशिकांत सुतार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष यशपाल या वेळी उपस्थित होते.

किशोरी आमोणकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सात दिवस चालणार्‍या या परिषदेसाठी विविध देशांमधील सुमारे ५०० प्रतिनिधी आले आहेत.

गेल्या सातशे वर्षात भौतिक - ऐहिक पातळीवर युरोपने आघाडी मारली आणि प्राचीन चिंतन- परंपरा असलेले हिंदुस्थान, चीन आणि अरब प्रदेश झपाटयाने मागे पडू लागले. सुमारे ५०० वर्षांपूर्वी ज्या वैज्ञानिक क्रांतीचा व नंतर औद्योगिक क्रांतीचा उदय व विस्तार युरोपमध्ये झाला, त्यामुळे तेथील धर्मव्यव्स्थालाच नव्हे, तर तत्त्वज्ञानाला आणि प्रस्थापित नीती - विचारालाही आव्हान मिळाले. बंदिस्त कॅथलिक
धर्माची बंधने झुगारुन बंडखोरांनी जर प्रोटेस्टंट परंपरा निर्माण केली नसती, तर कदाचित वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीही झाली नसती. विज्ञाने जेव्हा प्रस्थापित श्रद्धा आणि मूल्ये याबाबत मूलभूत प्रश्‍न विचारवयास सुरुवात केली, तेव्हा त्यांना धर्ममार्तंडांनी जाळून टाकले, तुरुंगात टाकले वा
बहिष्कृत केले. ज्या वैज्ञानिकांचा हा छळ झाला, ते परमेश्‍वराच्या विरुद्ध तर नव्हतेच. धर्माच्याही विरुद्ध नव्हते. त्यांनी फक्त विश्‍वाच्या रहस्याचा वैज्ञानिक शोध घ्यावयास सुरुवात केली होती. त्या अर्थाने हे वैज्ञानिक आपल्याकडील ऋषी- मुनी परंपरेतलेच होते. ते सत्याच्या शोधात निघालेले
एकांडे प्रवासी होते. सत्ताधार्‍यांना, धर्ममार्तंडांना आणि निर्बुद्ध प्रवाहपतितांना अशी जिज्ञासू माणसे शत्रूस्थानी भासतात; कारण ही माणसे सॉक्रेटिसप्रमाणे सारखी प्रश्‍न विचारित राहतात. ती असमाधानी, अस्वस्थ आणि बौद्धिकदृष्टया अतृप्त असतात. ही वैज्ञानिक ‘प्रोटेस्टंट’ परंपरा येथील संतपरंपरेने जोपासली; परंतु येथील प्रस्थापितांनी मात्र तिला ठेचून काढण्याचा प्रयत्‍न केला. त्यामुळे संतपरंपरेतील बंड मागे पडले आणि असहाय झालेल्या लोकांनी संताचेच देव्हारे उभे केले. ज्ञानेश्‍वर हे सर्वार्थाने आद्य बंडखोर होते, विज्ञान- चितंक होते आणि तरीही अध्यात्मवादी होते. ती बुद्धिवादी परंपरा खंडित झाल्यामुळे असेल किंवा भारतीय उपखंडातील उत्पादक शक्तींचा विकास युरोपच्या विस्तारवादामुळे कुंठित झाल्यामुळे असेल, या भागात ती वैज्ञानिक - औद्योगिक क्रांती झाली नाही. भौतिक विकासाच्या ‘शर्यतीत’ मागे पडलेले आशियातील देश नवी आव्हाने न स्वीकारल्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही निष्प्रभ ठरु लागले. पाश्‍चिमात्य देशांत तत्त्वज्ञानाने स्वत:ला केवळ धर्मसंस्थेपासून वेगळे करुन घेतले नाही, तर विज्ञानापासूनही स्वत:ची वैचारिक मुक्तता करुन घेतली. त्याचप्रमाणे नीती - नियमांच्या स्वयंसिद्ध जंजाळातही तत्त्वज्ञान तेथे अडकून पडले नाही. त्यामुळे ग्रीक तत्त्वज्ञानाचा असलेला भरीव व समृद्ध वारसा अधिकच ताकदीने विकसित होऊ लागला. रेनेसॉं म्हणजे नवजीवन किंवा पुनरुत्थानाचा काळ (इ. स. १४५३ ते १६९०) , प्रबोधनाचा किंवा एन्‌लायटन्‌मेंट काळ (इ. स. १६९० ते १७८१) जर्मन तत्त्वज्ञान (इ. स. १७८१ ते १८३१) आणि नंतर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील एकूण ५०० वर्षात लिओनार्दो द विंची, ब्रुनो, कोपर्निकस, केप्लर, गॅलिलिओ, फ्रॅन्सिस बेकन आणि पुढे देकार्त, स्पिनोझा, लॉक, ह्युम, रुसो, कान्ट, हेगेल, मार्क्स, रसेल अशी एक तत्त्वज्ञांची प्रदीर्घ मालिकाच तयार
झाली. त्यांची मूलभूत प्रश्‍नांची चर्चा धर्मचर्चेच्या चौकटीत अडकली नाही. विज्ञानाला तर हे तत्त्वज्ञ दीपस्तंभासारखे होते. याउलट भारतात मात्र तत्त्वज्ञानाची चर्चा वेद, उपनिषदे, गीता यांतील विचारांच्या फारशी पुढे सरकली नाही. ज्ञानेश्‍वरांपासुन ते थेट लोकमान्य टिळक, महात्मा गांधीपर्यंत भगवद्‍गीता हाच मानदंड राहिला. मतभेद फक्त गीतेवरील भाष्यापुरते. वेदांचे अध्ययन पंडितांच्या चर्चेत अडकून पडले. तत्त्वज्ञानाचा अभ्यास म्हणजे या प्राचीन वाङ्‍मयाचा इतिहास, असा अर्थ झाला. त्याला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले. आणि तेव्हाच गुढवादाने आणि साक्षात्काराच्या संकल्पनेने तत्त्वज्ञान वेढले गेले. जो समाज मूलभूत प्रश्‍न विचारु शकत नाही त्यावर चिंतन - स्वातंत्र्य देत नाही आणि समाजातील जिज्ञासाच मारतो तो समाजलयाला जातो. मग ते रोमन साम्राज्य असो वा सोविएत युनियन असो. भारतवर्ष आपले तेज हरपून बसला, याचेही तेच सुप्त सामर्थ्य जागे करण्याची वेळ आली आहे. कधी नव्हे इतके जग आज गोंधळात सापडले आहे. धर्माच्या मर्यादा केव्हाच स्पष्ट झाल्या होत्या. आता विज्ञानाच्या मर्यादाही लक्षात येऊ लागल्या आहेत. अशा मोक्याच्या वेळेस तत्त्वज्ञान परिषदेने या प्रश्‍नांना सामोरे जाण्याचे धैर्य दाखविले आहे. त्याचे सर्वांनी स्वागतच करावयास हवे.

म. त. प. १५ वे अधिवेशन, हडपसर - पुणे तत्त्वज्ञान पुस्तकात न ठेवता सामान्यांपर्यंत पोचविण्याची
गरज - चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे मत

पुणे ता. २५ : तत्त्वज्ञान हे केवळ पुस्तकात न ठेवता सामान्य माणसांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आज येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या पंधराव्या अधिवेशनाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात हे अधिवेशन भरले आहे.

तत्त्वज्ञान हे पुस्तकी असून चालणार नाही; त्याचा आणि सामान्य माणूस यांचा मेळ घालणे गरजेचे आहे. असे न्या. धर्माधिकारी यांनी नमूद केले. ते म्हणाले, "कोणतेही विचार हे व्यक्तिनिपेक्ष असतात. ते जेव्हा एखाद्या व्यक्तिच्या नावावर आणि विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाच्या नावावर मांडले जातात, तेव्हा त्यांना तत्त्वज्ञानाचे स्वरुप येते. मग मुळात प्रवाही असणारे विचार स्थिर बनतात. त्यातून पारलौकिकता वाढते व
परस्पारिकता कमी होते. अमुक एक तत्त्वज्ञान कळले किंवा नाही यावरच विद्वानांत चर्चा होऊ लागते आणि मूळ तत्त्वज्ञान या संघर्षात हरवले जाते असे होऊ न देता तत्त्वज्ञानाचा जीवनाशी संबंध लावला पाहिजे.

तत्त्वज्ञाच्या गोष्टी सांगून सामान्यांच्या तात्त्विक भूमिकेलाच शह देण्याचा प्रकार हल्ली होत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, "समाजाची मूल्ये बदलत आहेत. कायदा मोडणारेच प्रतिष्ठित बनत आहेत. पैसा, दंडेलशाही आणि माफिया यांनाच महत्त्व आले आहे. अशांमध्ये सामान्यांची कुचंबणा होत आहे. भारत हा पहिल्यापासून संपन्न देश आहे. मात्र येथील विशिष्ट लोकांनीच त्याचा उपयोग घेतला आणि घेत आहेत. अशा स्थितीत समता प्रस्थापित करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे. प्रस्थापितांना बदल नको असतो आणि सार्वत्रिकीकरणही नको असते. त्यांच्या वृत्तीत बदल करायला हवा."

डॉ. निगवेकर म्हणाले, "तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, भाषा आदी मानव्यशास्त्रातील विषय अलीकडच्या काळात काहीसे बाजूला पडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. वास्तिवक हे विषयच समाजाला बळकटी देत असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मानवाची आणि समाजाची भौतिक प्रगती होते; पण मानवी अंतरंग समृद्ध करण्याचे काम मानवशास्त्र करीत असते. त्यामुळे या विषयांचे महत्त्व जानून घेणे गरजेचे आहे. तत्त्वज्ञानासारखा विषय सामान्यजनांपर्यंत पोचायला हवा. त्यासाठी या विषयाची मराठीतीतल पुस्तके उपल्बध व्हायला हवीत. पुणे विद्यापीठ आणि मराठी तत्त्वज्ञान परिषद यांनी या कामी एकत्र येऊन उपक्रम सुरु करावा."

कार्यध्यक्ष बी. आर. दोशी यांनी अहवालाचे वाचन केले. अध्यक्ष डॉ. शि. श. अंतरकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल तुपे यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. मे. पुं. रेगे; तसेच तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिवेशनास उपस्थित आहेत. दुपारच्या सत्रात समतेची संकल्पना आणि विषमतेची समस्या या विषयावर परिसंवाद झाला.